:*प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी*
मेढा, ता. जावळी, जि. सातारा – जयवंत प्रतिष्ठान, हुमगाव यांच्या संचालनाखाली आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्र, NSS विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन २०२५ यशस्वीरित्या संपन्न झाला.
दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजता आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ. सुधीर रामदास नगरकर यांनी सांगितले की वाचन ही केवळ सवय नसून संस्कार आहे; नियमित वाचन व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधते.
या कार्यशाळेत सौ. गायत्री जाधव यांनी “भारतीय संविधान : उद्देशिका, अधिकार व कर्तव्य” या विषयावर वर्णनात्मक प्रकट वाचन सादर केले. त्यांनी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडली. उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि वाचनातून प्रेरणा मिळवली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, संविधानाचे महत्त्व आणि नागरिक म्हणून भूमिकेबाबत स्पष्ट समज विकसित झाला.
मुख्य पाहुणे डॉ. प्रमोद घाटगे यांनी वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, विचारशक्ती आणि मूल्यनिष्ठ शिक्षण यांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “वाचाल तर वाचाल” असे सांगितले व डिजिटल युगात सोशल मीडियाच्या जलद माहितीत अडकून न पडता संदर्भग्रंथ व चिंतनशील साहित्य वाचण्याचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी सांगितले की, “आपण सर्वजण दैनंदिन जीवनात वाचन करतो, पण काय वाचावे आणि काय वाचू नये हे ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन करण्याचे आवाहन केले आणि पुढे सांगितले की, “स्वतःचा विकास झाला तरच समाज आणि देशाचा विकास होतो.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एस. व्ही. धोंडे (NSS विभागप्रमुख) यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवरांचे, आयोजक विभागांचे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद साठे यांनी केले. त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाचे सर्व टप्पे उत्तम रीतीने पुढे नेले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ग्रंथालय परिचारक श्री. वसंत धनावडे, श्री. आबासाहेब देशमुख, श्री. अविनाश मदने यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढली, विचारशक्ती मजबूत झाली आणि संविधानिक शिक्षणाची जाणीव निर्माण झाली, असे आयोजकांनी सांगितले.
No comments:
Post a Comment