केळघर : सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे आजची युवापिढी इंटरनेटच्या जाळ्यात ओढली जात आहे. मात्र आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार, कष्ट करण्याची तयारी व कठोर परिश्रम यामुळे सामान्य कुटुंबातील अगदी छोट्याशा खेड्यातील युवक देखील आज उच्च पदस्थ अधिकारी होत आहेत. त्यामुळे युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे याबरोबरच आपले संस्कार कायम आपल्या सोबत ठेवावेत,निश्चित यशाला गवसणी घालता येईल असा विश्वास तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केला.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वरोशी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयडीबीआयचे सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक विजयराव मोकाशी,आमदार शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, वरोशी चे सरपंच विलास शिर्के, उपसरपंच संदीप कासुर्डे, ग्रामसेवक एन. के. जाधव, माजी सरपंच सुरेश कासुर्डे, केशव कासुर्डे, आतिष कदम आदींची उपस्थिती होती.
तहसीलदार पोळ म्हणाले, जावळी तालुक्यासारख्या दुर्गम व डोंगराळ विभागात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने गुणवत्तेची एक परंपरा निर्माण केली आहे. विद्यार्थानी श्रमाची लाज न बाळगता आहे त्या परिस्थितीवर मात करून यशस्वी व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी. शिंदे महाविद्यालयाच्या या श्रमसंस्कार शिबिरामुळे वरोशी गावात चांगली कामे होतील. श्री. मोकाशी यांनीही आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. घाटगे यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सात दिवस वरोशी येथे स्त्री आरोग्य ,पाणपोई स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वृक्ष संवर्धन, गटार स्वछता ,प्लास्टिक निर्मूलन , श्रमदान , सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. उदय पवार यांनी आभार मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश