Saturday, 15 April 2023

मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी

मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी
जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य मेजर अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखविताना असे प्रतिपादन केले की,महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.ज्योतीरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली.खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे.महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड,सार्वजनिक सत्यधर्म,गुलामगिरी यासारखे अनेक ग्रंथ लिहून समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा.शंकर गेजगे यांनी तर आभार डॉ.संजय भोसले यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Monday, 10 April 2023

गीता संदेश

गीता संदेश
केल्याशिवाय मिळत नाही - मोफत घेणार नाही
केलेले फुकट जात नाही - निराश होणार नाही
काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे
- न्यूनगंड ठेवणार नाही
काम करीत जा, हाक मारीत जा,
मदत तयार आहे.
- विश्वास घालवणार नाही
( पांडुरंगशास्त्री आठवले

Sunday, 2 April 2023

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवल साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवल साजरा 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, रांगोळी, फोटोग्राफी, पोस्टर आणि पुष्प रचना यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी किसनवीर महाविद्यालय, वाईच्या वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंजुषा इंगवले ह्या  प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.  त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा चे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. आर. घाटगे, अग्रणी महाविदयालय  योजनेचे समन्वयक श्री. शंकर गेजगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेमध्ये किसनवीर महाविद्यालय, वाई, गिरिस्थान आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालय, महाबळेश्वर, लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज, सातारा, मिनलबेन मेहता महाविद्यालय पाचगणी इत्यादी महाविद्यालयामधून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. एकूण २५१ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अग्रणी महाविदयालय  योजनेंतर्गत करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचे मुल्यांकन करणेकरिता डॉ. बी. ए. कोरे, श्रीमती डी. डी. धुमाळ श्री. ए. एम. लकेरी, श्रीमती. स्नेहल गायकवाड व श्री. सुनील भोईटे या परीक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पी. डी. पाटील यांनी केले. या उपक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. एस. जी. केमदारणे यांनी केले व सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल घाडगे व कु. पूजा माने यांनी केले. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सायन्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी बहुमोल सहकार्य केले तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले.

Friday, 24 March 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम क्रमांक*
============
मेढा 23 मार्च 2023

जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, नेहरू युवा मंडळ सातारा व यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्क जाकातवाडी सातारा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या कबड्डी स्पर्धा सातारा येथील शाहू स्टेडियम येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता.त्यावेळी अटीटतीच्या व रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून,प्रथम क्रमांक प्राप्त केला.महाविद्यालयातील रोहित जाधव, राजेश देशमुख, कार्तिक कासार, ओमकार शेलार, प्रमोद जाधव,अभिषेक शिंदे व पुनीत पवार या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळी करून हे यश संपादित केले.या सर्व विध्यार्थी खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल सर्व खेळाडुंचे संस्था अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे, सर्व विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Friday, 10 March 2023

' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*

' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी* 
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सावित्रीबाई फुले यांचा पुण्यदिन साजरी करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांशी समरस होऊन त्या शिक्षित झाल्या. पहिली स्त्री शिक्षिका म्हणून आज त्या ओळखल्या जातात. शिक्षण घेतल्यानंतर समाज जागृत झाला पाहिजे यासाठी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करला परंतु त्या आपल्या ध्येयापासून वंचित झाल्या नाहीत. त्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक जागृती करण्याचा देखील प्रयत्न केला. पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आज एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उभा आहे. हा वाडा देखील आपणाला प्रेरणा देतो. समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांबाबत जागृत होऊन स्त्रियांचे संघटन करून सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विधवा स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नाभिक समाजाचा पहिला संप घडवून आणला. त्यांनी आपल्या विचारांचा वारसा जतन व्हावा यासाठी अनेक कविता, ग्रंथ यांचे लिखाण करून समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते या तत्त्वांचा आदर्श त्यांनी समाजात घालून दिला. जावली तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी देखील महाविद्यालयाची स्थापना करून समाज सुशिक्षित जागृत करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. या त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन गेली वीस वर्ष महाविद्यालय  त्यासाठी निश्चितच प्रयत्नशील आहे. जावली तालुक्यातील स्त्रियांना प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालय निश्चितच प्रयत्नशील राहील.
     या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले यांनी केले, तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार यांनी मांडले.

Wednesday, 8 March 2023

संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य

संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य!

प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी.
=====================
" जगभरात आठ मार्च या दिवशी महिलांच्या कार्याचा,त्यांच्या विचारांचा,त्यांच्या शक्तीचा ,आणि त्यांच्या अस्मितेचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचाच गौरव केला जातो.असे असताना आपले महाविद्यालय ज्या मातीवर उभे आहे त्याच जावळीच्या मातीत रुजून फुलून इतरांना फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करणे महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी असून त्याच बांधिलकीला जपताना आज हा सत्कार समारंभ साजरा करत
आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य!"
असे मत प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन व या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त करताना वरील विचार मांडले.
विचारमंचावर जावली तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा महिला उपस्थित होत्या.
    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना मा. प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी पुढे म्हणाले " आजच्या जगात महिलांनी स्वसंरक्षणासाठी कटिबद्ध असण्याची आवश्यकता आहे.इथून पुढील आयुष्यात विद्यार्थिनिंनी कठीणप्रसंग आल्यास घाबरून न जाता त्याला धैर्याने तोंड द्यावेआपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी यांनी जावलीसारख्या दुर्गम,ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यामागील संकल्पना स्पष्ट करून,
उपस्थित विद्यार्थिनींना कर्तृत्ववान महिलांच्या व्यक्तीमत्वातून भावी आयुष्यात समाजात काहीतरी सकारात्मक कार्य आपल्या हातून घडण्याची प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य, उपप्रचार्य व कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील विध्यार्थी व विध्यार्थिनींनी स्त्री मुक्तीची गाणी गायली व कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर जावली तालुक्यातील विविध क्षेत्रात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कामाने ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.यामध्ये मा.जयश्री शेलार (हिरकणी फौंडेशन ,सामाजिक क्षेत्र),मा.सुनिता पार्टे (सामाजिक क्षेत्र),मा.डॉ.ज्योती इंगळे (वैद्यकीय क्षेत्र),मा.राजश्री कदम (शैक्षणिक क्षेत्र),मा.मानसी संकपाळ (शासकीय क्षेत्र),मा.दिपाली गिरी (व्यावसायिक क्षेत्र),मा.विधिज्ञ.आरती शेटे (विधीसेवा क्षेत्र),मा.विधिज्ञ.पूनम कुंभार (सांस्कृतिक क्षेत्र),मा.सुकन्या जुनघरे (व्यावसायिक क्षेत्र),मा.माधवी चिकणे (शासकीय क्षेत्र),मा. सीमा पवार (आदर्श माता)या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
सत्काराला उत्तर देत असताना उपस्थित सत्कारमूर्ती कर्तृत्ववान महिलांनी आपला शून्यातून विश्व उभारण्याचा खडतर जीवनप्रवास,
त्यांची संघर्षाची वाटचाल उपस्थितांच्या समोर मांडली.अतिशय हृद्य असे मनोगत यावेळी प्रत्येकीने व्यक्त केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळच्या सत्रात,विद्यार्थीनिंसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून मा.श्री.अविनाश गोंधळी ,अध्यक्ष रेनबुकान कराटे दो असोसिएशन ,महाराष्ट्र हे उपस्थित होते.त्यांनी विध्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रा.गायत्री जाधव यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.शेवटी प्रा.धनश्री देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ बातमी