Thursday, 14 August 2025

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे “रानभाज्या महोत्सव” २०२५ उत्साहात साजरा*

*आमदार शशिकांत शिंदे  महाविद्यालय मेढा येथे “रानभाज्या महोत्सव” २०२५ उत्साहात साजरा* 
पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्याच्या आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा  घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळी आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा  वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली (मेढा) (अग्रणी महाविद्यालय योजना व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाज्या महोत्सव” २०२५ आयोजित करण्यात आला होता.
जावळी हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास ४२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कुर्डू, केना, कार्टुली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी, चीचुरटे, शेंडवाल, मोहर, टाकाळा, माट, केळ फुले, कडीपत्ता, आळू, भोकर, मोरचौडा, उडीद पाने, ओवा, चुका, घोळ, बरका, पात्री या सारख्या अनेक रानभाज्याची रेसिपी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणली होती. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती देण्यात आली. तसेच कृषी विभाग जावली यांच्या वतीने रानभाज्यांची विक्री करण्यासाठी शेतकरी बचत गटांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. या मध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सुद्धा खरेदी विक्री झाली. खरेदी बरोबरच रानभाज्यांची माहिती फलकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी ग्राहकांना दिली. 
या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. अजय शेंडे (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी  रानभाज्यांचे महत्त्व व गुणधर्म समजून घ्यावेत असे आवाहन केले. त्याचबरोबर कृषी विभागा मार्फत चालू असणाऱ्या योजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. उदय पवार (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख) यांनी रानभाज्यांचे महत्व विषद केले. प्रमुख व्याख्यात्या डॉ. प्राची क्षीरसागर (असिस्टंट प्रोफेसर इन बॉटनी मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स जीके, पुणे) यांनी त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या विविध रानभाज्यांचे महत्व त्यांच्या अनुभवी शैलीत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना स्व: अनुभवातून रोजगाराच्या संधी कश्या आत्मसात कराव्यात तसेच रानभाज्यांचे संशोधन व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा असे मार्गदर्शन केले. याच बरोबर त्यांनी ग्रामीण भागातील विविध उत्पादने व सेवांसाठी उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी रानभाज्यांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले.
या प्रदर्शनासाठी डॉ. प्रमोद घाटगे महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. श्री. बापूसाहेब रूपनवर (मांडल कृषी अशधकारी, मेढा) श्री. किरण बर्गे, श्री. एम. डी. माने, श्री.अजय पवार, श्री. फडतरे व जावळी तालुक्यातील सर्वच सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते सदर रानभाजी महोत्सवाचे सर्व आयोजनात सहाय्यक कृषी अधिकारी श्री. भानुदास चोरगे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सचिन नेवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याचबरोबर अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक डॉ. संजय भोसले यांचीही प्रमुख उपस्थिति होती. महाविद्यालयाच्या लिंकेज अंतर्गत डॉ. स्वप्नजा देशपांडे (विभागप्रमुख बी. हॉक. डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगांव), श्रीमती गायत्री जाधव आणि श्रीमती सई रसाळ यांनी पाककृतींचे परीक्षण केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती धनश्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रमाचे आभार श्री. प्रवीण जाधव (वनस्पतीशास्त्र विभाग) यांनी केले.
प्रदर्शनात विद्यार्थ्यानी बनविलेल्या रानभाज्यांच्या पाककृतींचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला तसेच, शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. सदर पाककृती स्पर्धेमध्ये ४८ विद्यार्थ्यांनी ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांची पाककृती तयार करून आणली होती. त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले आणि विजेत्यांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र याचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर रानभाज्या विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी   तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार यांनी उपस्थित राहून संपूर्ण सहकार्य केले.

No comments:

Post a Comment