Sunday, 15 January 2023

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर'

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर'

घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख. सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे.

हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक... 

सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा. असं सुरू असतानाच वडीलांची प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लग्नगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमचीच झाली. मात्र तेंव्हाही कुस्ती सोबतीला होती. पुन्हा कुस्ती लढायला त्यांनी सुरवात केली.

हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरले वडील...

कुस्तीत जिंकलेल्या इनामावर जगणं सुरू होते. त्यात संसारवेलीवर हुसेन आणि सिंकदर ही दोन फुले उमलली आणि मिळणाऱ्या बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले. त्यात त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचे, घाम गाळायचा पण कुस्तीची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते. 

भावाने वडिलांच्या हमालीचे ओझे घेतले पाठीवर...

सिकंदर अलीकडे चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. त्यात सिंकदरच्या वडीलांना आजाराने गाठले आणि त्यांची हमाली थांबली. खुराकाला लागणाऱ्या पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडीलाच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे. 

वडिलांचे स्वप्न पुर्ण....

आपल्या वडीलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचे ओझे कमी व्हावे, घरातले दारिद्र हटावे यासाठी रक्ताचे पाणी करणारा सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.

सिकंदर बक्षिसांनी बनला श्रीमंत....

आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीएस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.

✍️ पै.मतीन शेख 

    #कुस्ती

Thursday, 12 January 2023

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विशेष व्याख्यान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक डॉ. संग्राम शिंदे हे होते त्यांनी असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र हे आहे. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. लहानपणापासूनच त्यांनी व्यायाम खेळ अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. ते पाश्चात्य गुढवादाने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. याशिवाय स्वामी विवेकानंद यांच्या विविध घटनांची माहिती दिली तसेच राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या संकल्पक असून त्यांनी स्वराज्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावून कुटुंबाबरोबर स्वराज्याची जबाबदारी निष्ठेने सांभाळली.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत आपले विचार मांडून वैदिक धर्माला जागतिक धर्म परिषदेत अधिष्ठान मिळवून दिले. याप्रमाणेच त्यांनी उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. या संदेशातून प्रेरणा घेऊन युवकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करून आपलं वेगळे अस्तित्व निर्माण करावे म्हणजे देशाचाही नावलौकिक वाढण्यास मदत होईल तसेच राजमाता जिजाऊ यांनी देखील प्राप्त परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकीचा विचार न करता स्वराज्याची निर्मिती करून रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. त्यामुळे स्वराज्य हे आपले आहे याची जाणीव होऊन अनेक मावळ्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपले प्राण दिले. अशा या थोर महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करुन आपले ध्येय प्राप्त करावे
 या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सातारा च्या संचालिका सौ. दिपाली देशमुख, श्री मयूर देशमुख आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे शिक्षक, 30 विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या इन्स्टिट्यूट च्या सहकार्याने महाविद्यालयातील 120 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.
 प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले यांनी केले तर आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा. शंकर गेजगे यांनी मानले.

Thursday, 5 January 2023

**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*मेढा . .

**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*

मेढा . दि . ४ , धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर सोनगाव या ठिकाणी जावली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या.
शिक्षण विभाग -पंचायत समिती जावली मेढा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयने तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला .
   तृतीय क्रमांक इयत्ता १२ वी सायन्स मधील विद्यार्थी वेदांत जगताप व क्रिश माने यांनी होलोग्राम ( थ्रिडी इमेज ) हा प्रकल्प तयार केला होता त्यांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर उत्तेजनार्थ क्रमांक रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पाला मिळाला . इयत्ता ११वी च्या साहिल ससाणे व मंथन जगताप यांनी हा प्रकल्प तयार केला होता .
सदर विद्यार्थ्यांना विज्ञान विभागाच्या श्रीमती प्रा .ज्योती कदम यांनी मार्गदर्शन केले .
 गटविकास अधिकारी श्री रमेश काळे व गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल व शिक्षण विस्तार अधिकारी श्री . चंद्रकांत कर्णे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉपी देऊन विद्यार्थांना गौरविण्यात आले .
विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी यांनी व उपप्राचार्य डॉ प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले .

Wednesday, 28 December 2022

सेवागिरी युवा महोत्सवातमेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक...

सेवागिरी युवा महोत्सवात
मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक...
=================
मेढा -
प. पू. सेवागिरी महाराज पुसेगाव,यांच्या अमृतमहोत्सवी
यात्रानिमित्त,श्री सेवागिरी ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेला नववा जिल्हास्तरीय युवा महोत्सव नुकताच उत्सवात पार पडला.या महोत्सवात घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत, येथील जयवंत प्रतिष्ठान आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या,विध्यार्थी कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यांचे विभागून द्वितीय क्रमांक आले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल दोन्ही विजेत्या संघांना रोख रक्कम,चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विध्यार्थी कलाकारांनी तसेच जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संघाने,मिळवलेल्या या यशाबद्दल,संस्थेचे अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशालीताई शिंदे,सर्व विश्वस्त आणि महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी दोन्ही संघांचे,
अभिनंदन व कौतुक केले.सदर विद्यार्थी कलाकारांना डॉ.ओमकार यादव, प्रा.पी.डी.पाटील,
प्रा.धनश्री देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते.

Sunday, 18 December 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच मौजे गवडी ता. जावली येथे 'युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास' 
हे ब्रीदवाक्य घेऊन संपन्न झाले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या 100 स्वयंसेवक -स्वयंसेविका यांनी मौजे गवडी येथील वेण्णा नदीवर वनराई बंधारा बांधला. हा बंधारा जवळपास 50 फूट लांब 5 फूट रुंदीचा असून त्याची उंची सहा फुटापर्यंत आहे. सदर बंधारा बांधकाम करण्यासाठी गवडी गावचे सरपंच श्री. राजाराम खुडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थानीही सहभाग घेतला तसेच तालुका कृषी अधिकारी, मेढा यांचे या वनराई बंधारा उभरणीत विशेष तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. सदर बंधारा बांधकामासाठी 1200 सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या , तसेच पाच ट्रॉली काळी माती, वाळू इ.साहित्य वापरण्यात आले आहे. या बंधारामध्ये 300 मीटर लांब आणि चार फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली असून त्यामुळे गवडी गावाला या उन्हाळ्यात पाण्याचा विपुल साठा होणार आहे. या बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार असल्याने पाणी टंचाई पासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या बंधारा बांधकामासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रम संस्करांबरोबरच सर्व विद्यार्थ्याना सामाजिक बांधिलकी जपणूक संदर्भात शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आमचे महाविद्यालय कायम अग्रेसर राहील.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संजय भोसले आणि प्रा.डॉ.उदय पवार तसेच प्रा.सौ.धनश्री देशमुख, प्रा.डॉ. सारंगपाणी शिंदे,प्रा. प्रकाश जवळ आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Sunday, 11 December 2022

*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या . स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश*

सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या .
 स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

सकाळ बातमी