आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा*
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच मौजे गवडी ता. जावली येथे 'युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास'
हे ब्रीदवाक्य घेऊन संपन्न झाले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या 100 स्वयंसेवक -स्वयंसेविका यांनी मौजे गवडी येथील वेण्णा नदीवर वनराई बंधारा बांधला. हा बंधारा जवळपास 50 फूट लांब 5 फूट रुंदीचा असून त्याची उंची सहा फुटापर्यंत आहे. सदर बंधारा बांधकाम करण्यासाठी गवडी गावचे सरपंच श्री. राजाराम खुडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थानीही सहभाग घेतला तसेच तालुका कृषी अधिकारी, मेढा यांचे या वनराई बंधारा उभरणीत विशेष तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. सदर बंधारा बांधकामासाठी 1200 सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या , तसेच पाच ट्रॉली काळी माती, वाळू इ.साहित्य वापरण्यात आले आहे. या बंधारामध्ये 300 मीटर लांब आणि चार फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली असून त्यामुळे गवडी गावाला या उन्हाळ्यात पाण्याचा विपुल साठा होणार आहे. या बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार असल्याने पाणी टंचाई पासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या बंधारा बांधकामासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रम संस्करांबरोबरच सर्व विद्यार्थ्याना सामाजिक बांधिलकी जपणूक संदर्भात शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आमचे महाविद्यालय कायम अग्रेसर राहील.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संजय भोसले आणि प्रा.डॉ.उदय पवार तसेच प्रा.सौ.धनश्री देशमुख, प्रा.डॉ. सारंगपाणी शिंदे,प्रा. प्रकाश जवळ आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment