*“भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता” : गटविकास अधिकारी श्री. रमेश काळे*
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाची लैंगिक छळ प्रतिबंधक समिती आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जावली(मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.रमेश काळे यांच्या हस्ते पार पडले.शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.वृंदा शिवदे,पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास योजना,सातारा,मा.डॉ.प्रियांका टकले,वैद्यकीय अधिकारी,सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,मा.शैलेश कांबळे,संचालक,कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र,कराड हे उपस्थित होते.शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी होते.तर शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ.प्रमोद घाटगे,मा.श्री.शाम राठोड,गटविस्तार अधिकारी पंचायत समिती जावली,मा.मानसी संकपाळ,पर्यवेक्षिका,एकात्मिक बालविकास सेवा योजना,जावली यांची.
उद्घाटनपर भाषणात मा.श्री.रमेश काळे,गटविकास अधिकारी ,पंचायत समिती जावली यांनी जावलीसारख्या दुर्गम भागातील महिला आणि मुलींना लिंगभाव,आरोग्य,कायदे,कौशल्य विकास अशा विविध विषयांबद्दल माहिती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.त्यांनी उपस्थित शिबिरार्थी मुलींना आपल्या सामाजिक भान जागृत ठेऊन विविध जीवनविषयक कौशल्ये आत्मसात करून आपल्या पायावर ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.दुर्गम ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा न्यूनगंड मनातून काढून टाकून येणाऱ्या भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या शिबिरामध्ये मा.वृंदा शिवदे यांनी सोशल मिडीयाचा सजग वापर या विषयावर,मा. डॉ.प्रियांका टकले यांनी मासिक पाळी आणि आरोग्य या विषयावर तर मा.शैलेश कांबळे यांनी स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी यांनी,आपल्या ध्येयाप्रती संवेदनशील राहून त्या ध्येयासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे हि आपली प्राथमिकता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादित केले तसेच आपल्या जवळ असणाऱ्या सकारात्मक उर्जेचा वापर आपण आपल्या विवेकाने योग्य ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अशा स्वरूपाच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन हे समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी उद्धृत केले.
No comments:
Post a Comment